Wednesday 25 January 2012

बाबा..

त्याचं बोट धरून लहानाचे मोठे झालो आपण.. ते आपले बाबा! किती आल्हाददायक वाटतं नं बाबा म्हणल्यावर!!
बाबा म्हणालं की प्रेम आणि दरारा ह्या दोनही भावना एकाच वेळी मनात जाग्या होतात.. निदान आमच्या पिढीपर्यंत तरी!
जेंव्हा त्याच बाबांना 'ए बाबा' म्हणताना पोरांना आईकलं की काहीतरी चुकल्यासारख वाटतं!
आई- ही नेहमी 'ए आई'च असली पाहिजे, कारण हक्काची वाटते आणि असते ती! आपलं काहीही खपवून घेते ती.. आणि बाबा- आदर आणि प्रेमयुक्त भीती वाटलीच पाहिजे त्यांच्या बद्दल!

माझे बाबा- अनेक वर्षे सैन्यात नोकरी केल्यानंतर बनलेले काहीसे कठोर पण हुशार आणि अतिशय प्रेमळ असे! सतत कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीसाठी प्रयत्नशील असलेले.. धाडसी, लवकर हार नं मानणारे, स्वप्नं पाहून ती पूरी करणारे होते.. दुर्दैवानं परदेशात फिरून येण्याचा त्यांचं स्वप्न मात्र त्यांच्या नुकत्याच छापून आलेल्या पासपोर्ट मधेच बंद झालं..!

आमचं बालपण पुण्यातल्या कसबा पेठेत गेलं.. मध्यभागी दत्ताचं मंदीर असलेला वाडा खरं पाहता पूर्वी आमचाच होता, पण आमच्या दानशूर पूर्वजांनी वाड्यातल्या अनेक खोल्या पुरानंतर गरजूंना 'अशाच' राहायला दिल्या.. तरीपण ३ मजल्याच्या घरात आम्ही राहत होतो.. खाली १ खोली, तिथूनच सारवलेल्या बोळातून पुढे आल्यावर एक अरुंद जीना, मग हॉल आणि स्वयंपाकघर अश्या कोबा घातलेल्या दोन खोल्या आणि वरती माळा... त्या जिन्यावरून कित्येकदा तरी मी गडगडून खाली आल्याचं आणि माळ्यावरती न जाण्याकरता आजीने दाखवलेल्या 'भोकाडी' च्या भीतीने आम्ही घाबर्गुंडे झाल्याचं चांगलंच आठवतंय..
त्यावेळी आम्ही घरामध्ये ७ जण होतो.. आणि कमावणारे मात्र बाबा एकटेच!! असं सगळं आठवलं की असं वाटतं आज आपल्या घरात माणसे ४ आणि कमावणारे ३ असूनदेखील पैसे पुरत नाहीत, तेंव्हा आपल्या बाबांनी अवघ्या काही हजारांच्या पगारात कसं काय ७ जणांना खाऊ घातलं असेल? खूप अभिमान वाटतो त्यांचा!  त्याहूनही जास्त आश्चर्य वाटतं ते ह्याचं की एवढ्याश्या पगारातही खटपटी करून पैसे गुंतवून, आमची लग्न थाटामाटात केली, ५ खोल्यांचा ब्लॉक  घेतला, एकावेळी २ कारही होत्या आमच्या कडे आणि बरोबरीने भारतभ्रमणही.. कसं manage केलं असेल त्यांनी हे सगळं?

हो, सुरुवातीला होत परिस्थिती अशीतशीच! मला आजही आठवतंय, बाबांची १०० रुपयांची नोट कुठेतरी गेली होती, तर इतके कासावीस झाले होते ते.. पण तेंव्हा आम्हाला हे कळतंच नव्हतं की कदाचित ती त्यांची एका किंवा दोन दिवसांची कमाई होती! आणि ती नोट सापडल्यानंतर त्यांच्या आणि आईच्या चेहेऱ्यावरचा दिलासा.. आजही ते चेहेरे ठळक आहेत डोळ्यांसमोर.. मी सातवीत असताना शाळेच्या gathering ला घालायला माझ्याकडे कपडेच नव्हते..आणि त्यामुळे तेच कपडे ३-४ दिवस पिदडलेले.. मैत्रिणींनी विचारल्यावर सांगितलेलं, ''इतकी घाई झाली की मिळतील ते कपडे घातले''..
अश्या सर्व परिस्थितीतून बाहेर येऊन, ज्यांच्यामुळे भरपूर शिकून चांगले दिवस बघता आले ते आई आणि बाबाच! आज माझा भाऊ software engineer आणि मी HR म्हणून नामांकित IT कंपनीत काम करत आहोत.. आणि कुठेतरी त्यांचं, आईचं, आजीचं, आणि आजोबांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधानही अनुभवतो!!

आज सगळं आहे, पण तेच नाहीत! खूप वाईट वाटतं.. खरंच का आपल्या नोकऱ्या इतक्या महत्वाच्या होत्या की ते जेंव्हा फोन करायचे तेंव्हा कामाच्या pressure मुळे त्यांच्याशी बोलणे टाळायचो, त्यांना भेटायला weekend ला जायचो.. त्यांनी आयुष्यभर नोकरी केली कारण आम्ही मोठ व्हावं.. पण कदाचित इतकं मोठही नाही की त्या नोकरीतून त्यांच्याशीच बोलायला ५ मिनिटं पण नं मिळवीत..  ते हॉस्पिटलमध्ये असताना शेवटी शेवटी मात्र मी जमेल तेंव्हा जायचेच.. अडीच महिने आजाराशी लढून इथे मात्र त्यांना यश नाही आलं. शेवटचे अनेक दिवस ventilator वरच होते, आणि मध्ये जेंव्हा एक दिवस ventilator काढला, तेंव्हा शेवटचं बोलले ते माझ्याशीच! जाणवत होत त्यांना किती त्रास होत होता ते, पण आपण काहीही झालं तरी त्यांच्यासमोर डोळ्यातून पाणी येऊ द्यायचं नाही इतकं मात्र मी ठरवलेलं पक्कं.. पण तोंडातून नळ्या असल्यामुळे बोलता येत नसताना, आणि हातामध्ये सुया टोचलेल्या असतानाही जेंव्हा त्यांनी लिहिलं 'तारीख?' मी म्हणाले ''२४'' आणि 'वार?', मी म्हणाले 'बुधवार',  'किती वाजलेयत?' तेंव्हा मात्र.. नाही उत्तर देऊ शकले शब्दात.. फक्त हमसून हमसून रडले.. आजही लिहिताना रडतेच आहे.. ह्या सगळ्यात हेही जाणवलं की आईने मात्र तपश्चर्या केली आयुष्यभर.. रोज बसने प्रवास करून ये-जा करायची.. प्रत्येक परिस्थितीत त्यांच्या जवळ असायची.. त्यांना शुद्ध नसतानाही!! आणि त्यांनी कृत्रिम का होईना पण शेवटचा श्वास घेतला तोही 'ती' हॉस्पिटल मधून निघायच्या काहीच क्षण पूर्वी!!

माणूस कितीही जवळचा असला तरी ज्याचे भोग त्यालाच का भोगावे लागतात.. का आपण ते वाटून घेऊ शकत नाही? का आपल्याला आपले इतके जवळचे लोक सोडून जातात, आणि आपण मात्र काहीच करू शकत नाही? त्या क्षणी जरी आयुष्य थांबल्यासारखं वाटतं तरीपण का आपण पुन्हा जगायला शिकतो? आणि का आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरं कधीच मिळत नाहीत?

ह्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत तरी ती शोधताना हे मात्र समजलं की आज जे आपल्याजवळ आहेत  त्यांना जास्तीतजास्त आणि जमेल तेवढा वेळ मात्र नक्की द्यायचा.. त्यांना आपल्याकडून पैसे, गिफ्ट्स असं काहीच नको असतं.. हवा असतो तो फक्त वेळ! आपल्याजवळ पिक्चर पाहायला ३ तास असतात पण आई-बाबांना भेटायला, त्यांना घेऊन बाहेर जायला मात्र वेळ नसतो.. उद्या ते नसताना खेद करत बसण्यापेक्षा आजच त्यांना आपला 'valuable time' देऊन त्यांना आनंद द्या.. तरच तुम्हालाही तो मिळेल.. त्यांनी आत्तापर्यंत जे केलं, त्याची परतफेड तर नाहीच होऊ शकत पण त्यांना हे मात्र नक्की जाणवून द्या की किती valuable  आहेत 'ते'- 'तुमच्यासाठी'.. तुमचा वेळ देऊन!!