Thursday, 13 December 2012

मातृत्व- एक अद्भुत अनुभूती..

येणाऱ्या बाळाची चाहूल लागताच सगळं जग कसा सुंदर वाटू लागतं.. आपल्या गर्भामध्ये एक जिवंत देह वाढतोय हि कल्पनाच किती सुखावह असते .. आणि त्याची अनुभूती फक्त एक 'आई'च घेऊ शकते जी एका बाळाला जन्म देणार असते..
त्या जीवाची वाढ होणे त्याचे सर्व अवयव विकसित होणे, त्याला बुद्धी, प्रज्ञा, शक्ती, काया, वाचा, मन प्राप्त होणे हा एक दैवी चमत्कारच आहे.. आणि नीट  विचार केल्यानंतर केवळ ९ महिन्यांमध्ये परमेश्वर आपल्याला आपल्यासारखाच आणि आपलाच एक अंश असलेला मानव देऊन आपल्याला एक अमूल्य भेटच देतो.. हि कदाचित एकमेव अशी गोष्ट असेल जी जगातला कितीही मोठा शास्त्रज्ञ किंवा कोणताही बुद्धिवादी जीव किंवा कोणतेही यंत्र कधीच निर्माण करू शकत नाही.. देवाचे अस्तित्व न मानणारे ह्या क्रियेला 'निसर्ग' म्हणतील इतकंच!
त्या जीवाची दिवसागणिक वाढ जर का आपण बघितली तर कदाचित आपल्या लक्षात येईल कि ज्या प्रकारे निसर्ग किंवा परमेश्वर याची दक्षता घेतो, ती केवळ आणि केवळ भगवंताची कृपाच किंवा एक चमत्कारच! केवळ अवयव प्रदान करणे इतकेच हे कार्य नसून कितीतरी सूक्ष्म बाबींचा त्याला विचार करावा लागत असेल.. डोळ्यांना 'दृष्टी'  असणे, जिभेला 'चव' घेण्याची तर कानांना श्रवणाची क्षमता असणे, हाता-पायांमध्ये शक्ती असणे, नाकामध्ये श्वसन आणि वास घेण्याची क्षमता असणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हृदयातली धडधड अविरत चालू ठेवणे हे सर्व केवळ परमेश्वरी चमत्कारच आहेत.. पण तोच श्वास जेंव्हा 'त्या'ला थांबवायचा असतो, तेंव्हा डॉक्टर्स सुद्धा काही करू शकत नाहीत..
हा सगळा विचार केला तर ९ महिने हा खरंतर खूपच कमी कालावधी आहे आणि परमेश्वराकडून मानवाला मिळालेली एक देणगीच आहे हे नक्की..
'आई' अशी हाक मारणारं आपलं स्वतःचं एक बाळ असावं अशी प्रत्येक स्त्रीची आकांक्षा असतेच! खरंतर, स्त्री ला मातृत्वानंतरच समाधान आणि आंतरिक शांतता प्राप्त होते.. प्रसूती कशीही झाली असो, आपल्या बाळाच्या केवळ स्पर्शानेच ती आई सर्व प्रसूती वेदना विसरून जाते आणि तिला पान्हा फुटतो..
लहान मुले हि परमेश्वराचा अंशच, ह्यात काही शंका नाही.. त्यांचं  वाढणं, हळूहळू रंगायला, चालायला बोलायला लागणं हे बघताना प्रत्येक आईला मातृत्वाचा अभिमानाच वाटत असणार!
ज्यांना परमेश्वरी कृपेने हे भाग्य लाभले, त्यांनी आपल्या देशाच्या, राष्ट्राच्या आणि कुळाच्या संस्कृतीचा विचार करून त्यांच्या मुलांवर उत्तम संस्कार करावेत आणि हे सुख दिल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानावेत.. ज्यांना दुर्भाग्याने/ दुर्दैवाने हे सुख प्राप्त झाले नाही त्यांनी एखादे अनाथ मुल दत्तक घेऊन समाजाचे ऋण फेडावेत आणि पालकत्वाचा आनंद उपभोगावा.. शेवटी, जन्मापेक्षाही जास्त महत्व कशाला असेल तर ते संस्कारांनाच!

No comments:

Post a Comment